www.24taas.com, श्रीनगर
उत्तर काश्मीरमधील कूपवाडा जिल्ह्यात दहशतवादी आणि संरक्षण दलाच्या जवानांमध्ये गुरूवारी जोरदार चकमक उडाली. या चकमकीत तीन संशयीत दहशवादी ठार झालेत. संरक्षण दलाच्या जवानांनी एका जंगलात शोधमोहिम सुरू केली होती.
जंगलभागात पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत 21 राष्ट्रीय रायफल्सची तुकडीही सहभागी झाली होती. मोहिमेदरम्यान, जंगलभागातून दहशवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. याला उत्तर देताना तीन दहशतवादी ठार झालेत. या मोहिमेअंतर्गत श्रीनगरपासून शंभर किलोमीटर अंतरावरील झाचलदरा गावातील जंगल परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती.
या नाकांबदीच्यावेळी दहशतवाद्यांनी अचानकपणे जवानांवर हल्ला चढविला. त्याला प्रत्युत्तरदाखल जवानांनीही दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. लष्कराच्या जवानांमध्ये ही चकमक सुरू असून या घटनेतील जीवित हानी हाती आलेली नाही, अशी माहिती लेफ्ट. कर्नल. जे. एस. ब्रार यांनी दिली. अशाच एका कारवाईत २८ मार्च २०१२ रोजी लष्कर- ए- तैयबाचे पाच दहशतवादी मारले गेले होते. दरम्यान, या दहशतवाद्यांची ओळख अद्यापि पटलेले नाही. लष्कराची कारवाई अजूनही सुरूच आहे.