www.24taas.com, नवी दिल्ली
काँग्रेसच्या मानगुटीवर आता बोफोर्सचे भूत बसण्याची शक्यता आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या पदाचा वापर केल्याचा दावा स्वीडनचे माजी पोलिस अधिकारी स्टेन लिंडस्ट्रोम यांनी एका मुलाखतीत केला आहे. लिंडस्ट्रोम यांनी अमिताभ बच्चन यांना क्लीन चीट दिली आहे.
शस्त्र दलाल ओक्टाव्हिओ क्वात्रोचीला घोटाळ्याच्या कारवाईतून वाचवण्यासाठी राजीव गांधी यांनी आपल्या पदाचा वापर केल्याचा दावा त्यांनी करताना १९८६ मध्ये राजीव गांधी सरकारने बोफोर्स तोफा खरेदी केल्या होत्या. या तोफा खरेदी व्यवहारामध्ये कथितरीत्या लाच देण्यात आल्याची माहिती १९८७ मध्ये उघड झाली होती. गांधी यांनी या प्रकरणी लाच घेतल्याचा कोणताही पुरावा नव्हता. मात्र, क्वात्रोची यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असतानाही दोन्ही देश त्यांना वाचविण्यातच धन्यता मानत होते. गांधी यांनीदेखील त्यांच्याविरोधात कोणतीही पावले उचलली नव्हती, असेही लिंडस्ट्रॉम यांनी सांगितले.
राजीव गांधी यांनी थेट पैशाची देवाणघेवाण केल्याचा पुरावा नसला तरीही त्यांनी ओक्टाव्हिओ क्वात्रोचीला वाचवण्यासाठी अरुण नेहरू यांच्यामार्फत प्रयत्न केले. या प्रकरणात अभिनेते अमिताभ बच्चन यांना विनाकारण अडकवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दोन दशकांपूर्वी भारतीय राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या बाफोर्स प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. इटलीचा उद्योजक ओट्टाव्हिओ क्वात्रोची याला वाचविण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना या प्रकरणात गोवले होते, असे ते म्हणालेत.
दरम्यान, या प्रकरणी दिलासा मिळाल्याने बच्चन यांनी समाधान व्यक्त केले. या आरोपांमुळे मला झालेला मानसिक त्रास मी सांगू शकत नाही, असे त्यांनी रात्री उशिरा पोस्ट केलेल्या ब्लॉगवर लिहिले. अनेक तास, दिवस, महिने आणि वर्षे मी सहन केलेला त्रास कोणीही समजू अथवा दूर करू शकणार नाही. शिवाय हे करण्यातही कोणी रस दाखविणार नाही, असेही त्यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले.