www.24taas.com,पहलगाम
शनिवारपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने हवामान अधिक बिघडण्याची शक्यता असताना आज सोमवारपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. पहलगामपासून सुरू होणाऱ्या या वर्षीच्या अमरनाथ यात्रेची मंडळाकडून पूर्ण सिद्धता झाल्याची माहिती श्री अमरनाथ देवस्थान मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन चौधरी यांनी दिली़
दरम्यान, यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक व्यवस्था करण्यात आली असून, येथे पर्यटक आणि यात्रेकरूंवर लक्ष ठेवण्यासाठी या वर्षी सीसीटीव्ही कॅमेरे आणि क्ष-किरण यंत्रेही बसविण्यात आली आहेत.
पहलगामकडून जाणारा पारंपरिक रस्ता आणि बलतालचा रस्ता, अशा दोन्ही रस्त्यांवरील बर्फ हटविण्याचे काम पूर्ण झाले आह़े सोमवारी जम्मू काश्मीरचे राज्यपाल आणि देवस्थान मंडळाचे अध्यक्ष एऩ एऩ व्होरा यांच्या हस्ते गुंफेतील शिवलिंगाचे पूजन होऊन यात्रेला औपचारिक प्रारंभ होणार आह़े. या यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी जम्मूवरून रविवारी सकाळीच रवाना झाली आह़े. ही तुकडी सांयकाळपर्यंत पहलगाम येथील शिबिरात दाखल होणार आह़े
गेल्या वर्षी वेळपत्रकानुसार यात्रा सुरू होण्याच्या पंधरवडाभर आधीच भाविकांना गुंफेच्या दिशेने मार्गक्रमणा करण्याची परवानगी देण्यात आली होती़ मात्र या वर्षीच्या खराब हवामानामुळे वाटेतील बर्फ काढण्यासच अधिक वेळ लागल्याने, अशी परवानगी देण्यात आलेली नाही़. नुनवान आणि बालताल येथे उभारण्यात आलेल्या यात्रा नियंत्रण कक्षातील हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या यंत्रणांकडून सोमवारी ताजी माहिती मिळाल्यानंतरच यात्रेकरूंना पुढे जाण्याची मुभा देण्यात येणार आहे.