www.24taas.com, बैतूल, मध्यप्रदेश
मध्यप्रदेशातील बैतूल इथं स्तुती आणि आराधना या जुळ्या बहिणांना जणू काय दूसरं जीवनच मिळालंय. जन्मापासूनच एकमेकांना जोडल्या गेलेल्या या बहिणींना वेगळं करण्यासाठी 23 डॉक्टरांना तब्बल 12 तास शर्थीचे प्रयत्न करावे लागलेत.
बैतूलमधल्या पाढर मिशन या हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी स्तुती आणि आराधना या बहिणींना ऑपरेशनसाठी दाखल केलं गेलं. स्तुती आणि आराधना या जुळ्या बहिणींचं डोकं वेगवेगळं असलं तरी जन्मापासूनच त्यांची शरीरं मात्र एकमेकांना जोडली गेली होती. चिंचोली ब्लॉकमधल्या चूडिया या गावातील रहिवासी माया यादव हिनं 2 जुलै 2011 रोजी या जुळ्या मुलींना जन्म दिला होता. पण, आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं यादव दांपत्यानं या दोघींना पाढर मिशन हॉस्पिटलला दान केलं होतं. त्यानंतर या हॉस्पिटलनंच या दोघा बहिणींचं पालन-पोषण केलं. राज्य सरकारकडून या मुलींच्या शस्त्रक्रियेसाठी 20 लाखांच्या मदतीच्या घोषणेनंतर पाढर मिशननं पुढची पावलं तातडीनं उचलली.
दोघींनाही भूलचं इंजेक्शन दिल्यानंतर तीन तासांना त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू झाली. ही शस्त्रक्रिया जवळजवळ पुढचे 12 तास सुरू होती. या शस्त्रक्रियेसाठी 23 डॉक्टर यावेळी हजर होते. यामध्ये काही विदेशी डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आलं होतं.
.