रायगडाला जेव्हां जाग येते @ २३०१

श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हां जाग येते’ या ऐतिहासिक नाटकाला सामाजिकतेची जोड दिल्यानेच २३00वा प्रयोगापर्यंत टप्पा गाठता आहे.ज्येष्ठ रंगकर्मी व नाटकात ‘शिवाजी’ची भूमिका साकारणारे अविनाश देशमुख यांनी व्यक्त केलं.

Updated: Nov 1, 2011, 03:51 PM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक

श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हां जाग येते’ या ऐतिहासिक नाटकाला सामाजिकतेची जोड दिल्यानेच २३00वा प्रयोगापर्यंत टप्पा गाठता आहे.ज्येष्ठ रंगकर्मी व नाटकात ‘शिवाजी’ची भूमिका साकारणारे अविनाश देशमुख यांनी  व्यक्त केलं.

 

महाकवी कालिदास कलामंदिरात सीमांत निर्मित ‘रायगडाला जेव्हां जाग येते’ या नाटकाचा २३0१वा प्रयोग झाला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी व नाटकात ‘शिवाजी’ची भूमिका साकारणारे अविनाश देशमुख यांनी नाटकाच्या प्रवासाबद्दल सांगितले, की १९८४ साली मी आणि मोहन जोशी यांनी सीमांतची स्थापना केली आणि ५ मार्च १९८४ रोजी कोल्हापूरला ‘रायगडाला..’चा पहिला प्रयोग सादर झाला. तेथून साठ दिवसांत पन्नास प्रयोग झाले आणि नाटकाला प्रतिसाद मिळत गेला.

 

नाटकात मी शिवाजींची तर मोहन जोशीने संभाजींची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी १९६२ पासून गोवा हिंदू असोसिएशनने या नाटकाचे ७५0 प्रयोग केले होते. मुंबईत नाटकाचे ७५ प्रयोग झाले तर उर्वरित सर्व प्रयोग महाराष्ट्रात ठिकठिकाणी झाले.

 

ग्रामीण भागात या नाटकाला विशेष प्रतिसाद लाभला. नाटकात कोणत्याही पात्राच्या कमरेला तलवार दिसून येत नाही. शिवाजींना आध्यात्मिक अधिष्ठान होते, हे मान्यच करावे लागेल. १९६२ साली रंगभूमीवर आलेल्या या नाटकाला पुढील वर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. नाटकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात काहीतरी वेगळेपण देण्याचा मानसही देशमुख यांनी व्यक्त केला. दरम्यान, आज झालेल्या नाटकात संभाजींची भूमिका अमित खेडेकर याने तर सोयराबाईंची भूमिका सौ. स्वाती देशमुख यांनी साकारली. नाटकाला नाशिककरांचा उदंड प्रतिसाद लाभला.

 

कानेटकरांनी विंगेत बसून या नाटकाचे सुमारे ३५ प्रयोग पाहिले. मुंबई-नाशिकचे प्रेक्षक चांगले व उत्स्फूर्त दाद देणारे आहेत. त्यांच्यात निखळ आनंद घेण्याची वृत्ती आहे. सध्या अर्थकारणामुळे नाटकाला कलावंत मिळणे मुश्किल बनले आहे. ‘रायगडाला जेव्हां जाग येते’ या नाटकात शिवाजी साकारतानाच ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकात औरंगजेबही साकारतो.

 

कानेटकरांनी पाचशे प्रयोगानंतर पुनर्लिखित केलेले हे एकमेव नाटक आहे. १२00 प्रयोगानंतर आम्ही दोन अंकी नाटक करायला सुरुवात केली. या नाटकात पिता-पुत्राच्या नात्याची गुंफण असून एक माणूस म्हणून शिवाजी-संभाजी कसे होते यावर दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. त्यामुळे नाटक प्रेक्षकांना जास्त भावते.