धारावीची वाटचाल करोनामुक्तीकडे, सलग दुसऱ्या दिवशी शून्य रुग्णांची नोंद

धारावीमध्ये कोरोनामुक्तीकडे वाटचाला सुरु आहे.

Updated: Jun 15, 2021, 07:26 PM IST
धारावीची वाटचाल करोनामुक्तीकडे,  सलग दुसऱ्या दिवशी शून्य रुग्णांची नोंद title=

मुंबई : मुंबईतल्या धारावीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे शून्य रूग्ण नोंदवले गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 2 फेब्रुवारीपासून आतापर्यंतच्या काळातलं, धारावीचं हे मोठं यश मानलं जात आहे. धारावीत सध्या फक्त अकराच अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये दोन जण कोरोनमुक्त झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीत कोरोना पसरू नये यासाठी, महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. 

महापालिकेच्या प्रयत्नांना यश

कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावीत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. दररोजची रुग्णसंख्या ४००हून अधिक नोंदवली जात होती. त्यामुळे मुंबईच्या चिंतेत मोठी वाढ झाली होती. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली. पालिकेने 'मिशन झिरो', 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' यासह विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या. याचे चांगले परिणाम पाहिला मिळाले, जानेवारी महिन्यात धारावीत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली. 

दुसऱ्या लाटेत धारावीत कोरोनचा प्रादुर्भाव काही प्रमाणात वाढू लागला. पण आधीच्या अनुभवावरुन मुंबई महापालिकेने वेळीच उपाययोजना आखत संसर्ग नियंत्रणात आणला आहे. धारावीतील कोरोना साथीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सलग दोन दिवस धारावीत एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाहीये. 

झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा घसरता आलेख

मुंबईतल्या झोपडपट्ट्यांनी आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोनाचा आलेख कमालीचा खाली आहे. मुंबईतल्या 24 पैकी 18 वॉर्डमध्ये एकही कन्टेंमेंट झोन नाही. तर अंधेरी पूर्वमध्ये 8 कंटेनमेंट झोन, कांदिवली 6, भांडूप 3, मुलुंड आणि चेंबूरमध्ये प्रत्येकी 2 आणि भायखळा प्रभागातील झोपडपट्ट्यांमध्ये केवळ एक कंटेनमेंट झोन शिल्लक आहे.