Mumbai Crime News: मुंबईतील साकीनाका हॉटेलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 48 वर्षीय एका महिलेचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत सापडला आहे. खळबळजनक म्हणजे महिलेचा मृत्यू दहा दिवसांपूर्वी झाला होता आणि तिची मुलगी या मृतदेहासोबत हॉटेलमध्येच राहत होती. या दोघी माय लेकी काही दिवसांपूर्वीच लंडनमधून भारतात परतल्या होत्या. पोलिसांनी महिलेच्या मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हॉटेलमध्ये दुर्गंधी पसरल्यानंतर सर्व हॉटेलची तपासणी करण्यात आली. त्याचवेळी एका खोलीत महिलाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये एका कौटुंबिक कारणास्तव लंडनमधून भारतात आले होते. अब्दुल करीम सुलेमान हलाई (82), नसीमा हलाई (48) आणि त्यांची 26 वर्षांची मुलगी, 22 वर्षांचा मुलगा या व्यतिरिक्त त्यांचा एक 15 वर्षांच्या नातवासाठी हॉटेलमध्ये रुम बुक केली होती.
लंडनमध्ये असताना नसीमा ट्यूशन घेत होती. मात्र, सतत उलटी आणि जुलाब होत असल्याने ती गेल्या 5 महिन्यांपासून आजारी होती. लंडनमध्ये उपचार घेतल्यानंतर ती काही महिन्यात बरी झाले. मात्र, मुंबईत प्रवासाच्या दरम्यान जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात तिला पुन्हा उलट्या आणि जुलाब सुरू झाले. मात्र, जानेवारी महिन्यातच नसीमा आणि तिच्या मुलीला हॉटेलमध्ये सोडून बाकी सर्व लंडनला निघून गेले.
नसीमावर मुंबईतच उपचार सुरू होते. मात्र, तब्येत जास्त बिघडल्याने 8 फेब्रुवारी रोजी हॉटेलच्या खोलीतच तिचा मृत्यू झाला. जवळपास 10 दिवस नसीमाचा मृतदेह तसाच हॉटेलच्या खोलीत पडून होता. नसीमाच्या मुलीने कोणालाच तिच्या आईच्या मृत्यूबाबत सांगितले नाही. ती आईच्या मृतदेहासोबतच त्या खोलीत राहत होती. त्याचवेळी हॉटेलमध्ये तीव्र दुर्गंधी पसरली होती. पण हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी उंदीर मेला असेल असं समजून दुर्लक्ष केलं.
हॉटेल कर्मचाऱ्यांनी संपूर्ण हॉटेलमध्ये साफसफाई केली मात्र त्यांना कुठेच उंदीरवगैरे सापडला नाही. मात्र दुर्गंध वाढतच होता. शेवटी त्यांनी नसीमाच्या खोलीची तपासायचे ठरवले. नसीमाच्या खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर आत जे पाहिले ते बघून कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला. नसीमाच्या मृतदेहासोबत तिची मुलगी राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीमाच्या खोलीतून हॉटेल काउंटरवर कमी ऑर्डर येत होत्या त्यामुळं त्या खोलीकडे लक्ष दिले नाही. म्हणूनच कोणाला काही कळले नाही. तसंच, नसीमाची मुलगी मानसिक रुग्ण आहे. तिचे मानसोपरचारतज्ज्ञांकडे उपचारही सुरू आहेत. मुलीने म्हटलं आहे की, तिच्या आईच्या मृत्यूची खबर तिने लंडनमध्ये तिच्या भावाला दिली होती. मात्र तो लगेचच मुंबईत पोहोचू शकला नाही. त्यामुळं तो आल्यानंतरच आईवर अत्यंसंस्कार होतील, असं समजून तिने आईच्या मृत्यूची माहिती कोणालाच दिली नाही. पोलिसांनी नसीमाच्या मुलीला कूपर रुग्णालयात दाखल केले आहे.