'लालबागच्या राजा मंडळावर सरकारचं नियंत्रण का येऊ नये?'

पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की करण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली

Updated: Sep 19, 2018, 03:10 PM IST
'लालबागच्या राजा मंडळावर सरकारचं नियंत्रण का येऊ नये?' title=

मुंबई : लालबाग राजाच्या मंडळातील अरेरावीची दखल धर्मदाय आयुक्तांनी घेतली असून आयुक्त शिवकुमार डिगे राजाच्या आवारात दाखल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबाग राजा मंडळाचे कार्यकर्ते पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. धक्काबुक्कीही केली. या प्रकरानं मंडळावर सरकारचं नियंत्रण का येऊ नये? असा प्रश्न उपस्थित केला गेलाय.

नुकतीच, लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा मुजोरी समोर आली होती. चक्क पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की करण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली. याआधीही लालबागचा राजाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी केल्याच्या घटना आहेत. हे मुजोरीचे प्रकार कधी थांबणार? उर्मट कार्यकर्त्यांना कोण वेसण घालणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.   

काय घडलं नेमकं... 

लालबागच्या राजाच्या दर्शनाला झालेली गर्दी नियंत्रित कशी करायची, यावरुन वाद सुरू झाला. आम्हाला आमचं काम करू द्या, असं पोलिसांचं म्हणणं होतं... तर गर्दीचं काय ते आम्ही बघतो, असं लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. त्यावरुन सुरू झालेला वाद हमरी-तुमरीवर आला आणि कार्यकर्त्यांनी चक्क पोलिसांनाच धक्काबुक्की सुरू केली. पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की करण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली.

पोलिसांवर हात उचलणं, हे कधीच खपवून घेण्यासारखं नाही, म्हणूनच हा सगळा प्रकार आम्ही गृहराज्यमंत्री रणजितसिंह पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला.

लालबागच्या राजाच्या दरबारात हे असले प्रकार सातत्यानं घडतायत.  राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अक्षरश: खेचून बाहेर काढलं जातं. महिलांनाही वाट्टेल त्या पद्धतीनं ओढून बाजूला सारलं जातं..... हे सगळं बिनबोभाट सुरू असतं.... याबद्दल वारंवार आवाज उठवण्यात आलाय. तरीही लालबाग राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी कमी होत नाही.... उलट ती एवढी वाढलीय की थेट खाकी वर्दीला आव्हान देत पोलिसांनाच धक्काबुक्की होतेय..... पोलिसांना धक्काबुक्की करण्यापर्यॆत लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांची मजल जातेच कशी ?  वारंवार असे प्रकार घडूनही या बेमुर्तखोर कार्यकर्त्यांवर कारवाई का होत नाही ? त्यांना कोण पाठीशी घालतंय? या सगळ्याची उत्तरं तातडीनं शोधणं गरजेचं आहे.