मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे. राज्यातल्या बदलत्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार आहे. शिवसेना-भाजप युती जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने अखेर शिवसेना भाजपसोबतचं नातं तोडून आपला मुख्यमंत्री बसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याची ही तयारी ठेवली आहे.
अरविंद सावंतांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीना दिला. एनडीएतून शिवसेना बाहेर पडली आहे. त्यामुळे आता भाजपच्या भूमिकेकडे लक्ष आहे. शिवसेनेच्या या कृत्रीमुळे युती तुटली असंच म्हणावं लागेल. कारण राष्ट्रवादीने तशी अट ठेवल्याची माहिती आहे.
शिवसेनेला पाठिंब्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादीत बैठका सुरू आहेत. शिवसेनेला पाठिंबा दिला तर नवं सरकार अस्तित्वात येणार आहे. पण भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा मुंबई महापालिकेत दिला आहे. आता शिवसेना एनडीएमधून बाहेर पडत असल्यामुळे मुंबई महापालिकेतील युती पुढे कायम राहणार की भाजप पाठिंबा काढून घेणार याकडे लक्ष लागलं आहे. या निम्मिताने आता नवी चर्चा सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेत बहुमताचा आकडा ११३ आहे.