दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातले तब्बल १९ लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकारी तीन दिवस संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्याचा कारभार पूर्णपणे ठप्प होणार आहे. येत्या ७, ८ आणि ९ ऑगस्ट हे तीन दिवस सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. राज्यातल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ७२ संघटनांनी एकत्र येत संपाची ही हाक दिलीय. राज्य सरकारने मागण्या पूर्ण कराव्या म्हणून संघटनांनी सरकारला ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, सरकारने त्याबाबत काहीच पावलं न उचलल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागल्याचं संघटनांचं म्हणणं आहे.
सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, कंत्राटीकरण बंद करावे, पाच दिवसांचा आठवडा यासह अन्य मागण्या या संघटनांनी सरकारकडे केल्या होत्या.
तीन दिवस संपावर जाणाऱ्या कर्मचार्यांमध्ये
अधिकारी - १ लाख ५० हजार
राज्य सरकारी कर्मचारी - ७ लाख
जिल्हा परिषद कर्मचारी - ६ लाख
चतुर्थ श्रेणी कर्मचारी - १ लाख ५० हजार
नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी - १ लाख
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी - २ लाख
यांचा समावेश आहे. आधीच विविध आंदोलनांमुळे राज्य सरकार अडचणीत असताना सरकारी कर्मचारी-अधिकार्यांच्या संपामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.