Maharastra Politics : लोकसभेला कल्याणमधून भाजप उमेदवार? श्रीकांत शिंदेंना ठरवून टार्गेट केलं जातंय का?

Bjp Candidate In Election Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदे गटात जुंपलीय, भाजपनं थेट कल्याणच्या जागेवर दावा ठोकलाय. 

सौरभ तळेकर | Updated: Dec 4, 2023, 08:21 PM IST
Maharastra Politics : लोकसभेला कल्याणमधून भाजप उमेदवार? श्रीकांत शिंदेंना ठरवून टार्गेट केलं जातंय का? title=
Kalyan LokSabha Constituency Of MP Shrikant Shinde

Kalyan Loksabha Election : कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (CM Eknath Shinde) चिरंजीव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) विरुद्ध भाजप वाद शमण्याचं नाव घेत नाहीयेत. यापूर्वी श्रीकांत शिंदेंविरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार केली होती. आता तर मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मतदारसंघ असणाऱ्या कल्याणवरच भाजपनं दावा ठोकलाय. कल्याण लोकसभा मतदारसंघावरून (Kalyan LokSabha Constituency) भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात पुन्हा तू तू मैं मैं रंगलीय. कल्याण-भिवंडीमध्ये भाजपचे जे उमेदवार उभे राहतील, ते निवडून येतील, असं वक्तव्य गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी केलंय. 

काय म्हणाले गणपत गायकवाड ?

कल्याण-भिवंडी मतदारसंघात लोकसभेला जे भाजपाचे उमेदवार उभे राहतील, ते निवडून येतील, असं वक्तव्य भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केलं होतं. तर अशी विधानं करणाऱ्यांना नंतर ती विधानं मागं घ्यायला लागली, अशी आठवण करुन देत श्रीकांत शिंदेंनी गायकवाडांना प्रत्युत्तर दिलंय.

श्रीकांत शिंदे म्हणतात...

मनोरंजनाच्या दृष्टीनं या वक्तव्यांकडे पाहिलं पाहिजे. यापूर्वीही अशी वक्तव्ये करण्यात आली होती. पण, ती मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. यांच्यावर टीका करण्यास मला वेळ नाही. आपला वेळ जनतेसाठी वापरला पाहिजे, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

कल्याणच्या जागेवर भाजपचा दावा

कल्याणमध्ये यापूर्वीही भाजप आणि श्रीकांत शिंदे यांच्यात धुसफूस पाहायला मिळाली होती. आता तर भाजपनं थेट कल्याणच्या जागेवर दावा केलाय. श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे सलग दुसऱ्यांदा खासदार आहेत. असं असतानाही भाजपनं थेट शिंदेंच्या जागेवर दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्यात.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभेतील पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता.