मुंबई : अंकिता पाटील, ज्या पुणे जिल्ह्यातून जिल्हा परिषदेवर काँग्रेसकडून निवडून आल्या आहेत, त्यांनी आपला साथीदार निवडला आहे. अंकिता या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. हर्षवर्धन पाटील हे पुणे जिल्ह्यातील राजकारणातलं मोठं नावं आहे. कन्या अंकितानेही ठाकरे घराण्यातला वर शोधला आ. अंकिता पाटीलने देखील हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत राजकारणाचे धडे घेतले आहेत.
भाऊ राजवर्धन पाटील राजकारणात सक्रीय होण्याआधीच अंकिताने राजकारणाचे सर्व धडे घेऊन झाले. तिने ऐनवेळी काँग्रेसकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवून विजय देखील मिळवला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस तर कधी अपक्ष विधानसभा लढवणारे हर्षवर्धन पाटील आता भाजपात आहेत.
अंकिता पाटील यांची ओळख महाराष्ट्राला या आधीच झाली होती. पण ठाकरे घराण्याचा आणखी एक ठाकरे या निमित्ताने समोर येत आहे. अंकिता आणि निहार ठाकरे यांची ओळख परदेशात शिक्षण घेताना झाली असल्याचं सांगण्यात येत आहे, आता मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोन्ही बाजूंनी मान्यता मिळाल्यानंतर ते लवकरच लग्नाच्या बेडीत बांधले जाणार आहेत.
निहार ठाकरे हे बिंदुमाधव बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचा १९९६ साली अपघातात मृत्यू झाला. निहार ठाकरे यांचं डोक्यावरचं छत्र बालपणीचं हरवलं.
पुढे निहार यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं, त्यांची मुंबईत लॉ-फर्म असल्याचं सांगण्यात येतं. निहार ठाकरे हे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासोबत अनेक फोटोंमध्ये दिसतात. निहार ठाकरे यांच्या आईचं नाव माधवी बिंदुमाधव ठाकरे असं आहे.