मुंबई: विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात येणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर आता युवासेना आक्रमक झाली आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही प्रकारे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत परीक्षा घ्या, असा युजीसीचा पवित्रा आहे. मात्र, सप्टेंबर महिन्यात कोरोनाची साथ संपणार आहे का? कोणत्या आधारावर युजीसीने हा निर्णय घेतला, असा सवाल युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.
परीक्षा घ्यायच्याच होत्या तर मग कोरोना केसेस कमी असताना घ्यायच्या होत्या. ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत जानेवारी महिना उजाडू शकतो. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल. युजीसीच्या गाईडलाईन्सनुसारच राज्याने परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, आता युजीसीच्या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात मी केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याला पत्र लिहल्याचे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.
Yuva Sena requests HRD Minister @DrRPNishank Ji to reconsider @ugc_india ‘s decision of compulsorily conducting final year exams.
We have also raised concerns on behalf of students and education fraternity.
Hope these are addressed as well. @AUThackeray pic.twitter.com/xrgIk3UmU0— Varun Sardesai (@SardesaiVarun) July 7, 2020
या सगळ्यात विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे राजकारण होऊ नये. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळून भाजप काही साध्य करू पाहत असेल तर यापेक्षा नीच राजकारण होऊ शकत नाही, अशी टीकाही वरुण सरदेसाई यांनी केली. या मुद्द्यावरुन आता पुन्हा एकदा केंद्र व राज्य सरकार आमनसामने आले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. तसेच अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थांनाही परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. मात्र, आता युजीसीने पुन्हा सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याची भूमिका घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन संभ्रम निर्माण झाला आहे.