3 तारखा 3 महत्वाच्या घोषणा, काय आहे 'हिंदूजननायक' राज ठाकरे यांचा मास्टर प्लॅन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे राबवणार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अजेंडा

Updated: Apr 19, 2022, 07:31 PM IST
3 तारखा 3 महत्वाच्या घोषणा, काय आहे 'हिंदूजननायक' राज ठाकरे यांचा मास्टर प्लॅन title=

मुंबई : 'हे जर बंद झालं नाही तर महाआरती करावी लागेल...'  कधीकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना सोडलेलं हे फर्मान. आता तोच आदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांना दिला आहे. येत्या 3 मे रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मनसेच्या वतीनं राज्यभरात महाआरती केली जाणार आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिवतीर्थवर झालेल्या बैठकीत महाआरतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. नेमकी याचदिवशी ईद देखील आहे. मनसेचा महाआरतीचा कार्यक्रम म्हणजे राज ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेची पुढची पायरी मानली जातेय. हिंदूजननायक अशी आपली नवी प्रतिमा तयार करण्यासाठी त्यांनी तीन मोठे मास्टरप्लॅन जाहीर केलेत.

काय आहे राज ठाकरेंचा मास्टर प्लॅन? 

1 मे - महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. ज्या मैदानात बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची मागणी पहिल्यांदा केली, त्याच मैदानात राज ठाकरेंची सभा होणार आहे.

3 मे - अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मनसेच्या वतीनं राज्यभरात महाआरती केली जाणार आहे. पोलिसांची परवानगी घेऊन महाआरती आणि हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे.

5 जून - जय श्रीरामचा नारा देत राज ठाकरे यादिवशी अयोध्या दौरा करणार आहेत. मनसेचे पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत अयोध्यावारीवर जाणार आहेत

आतापर्यंत राज ठाकरे ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून विकासाची भाषा करायचे. पण त्यातून मनसेची मतांची झोळी रिकामीच राहिली. आता भगवी शाल पांघरून राज ठाकरे कट्टर हिंदुत्वाच्या वाटेवर चालू लागले आहेत. त्यातून त्यांना किती राजकीय लाभ होईल हे पुढच्या काळात दिसेलच. मात्र राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मास्टर प्लॅनमुळे शिवसेनेसमोरचं आव्हान वाढलंय एवढं मात्र नक्की.