Western Railway Over Head Wire Technical Issue: ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या आठवड्याची सुरुवातच लेट मार्कने होणार असं चित्र दिसत आहे. बोरिवली स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक उशिराने सुरु असल्याचं पश्चिम रेल्वेच्या एक्स (आधीचं ट्विटर) अकाऊंटवरुन सांगण्यात आलं आहे.
ओव्हरहेड वायर तुटल्याने बोरिवली स्टेशनवरील 1 आणि 2 प्लॅटफॉर्मवरील वाहतूक ठप्प झाली आहे. .त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा, विरार रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झालेलं पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रशासनाकडून व्यवस्थित मार्गदर्शन होत नसल्यामुळे तसेच माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडालीय. मात्र या तांत्रिक गोंधळामुळे नोकरदारांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर लेट मार्क लागणार आहे.
सकाळपासूनच पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं पाहायला मिळत आहे. पश्चिम रेल्वेने एक्स अकाऊंटवरुन दिलेल्या माहितीनुसार, "बोरिवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरुन रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी ओव्हर हेड वायरमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. पॉइंट क्रमांक 107/108, पॉइंट क्रमांक 111/112 आणि पॉइंट क्रमांक 131/132 दरम्यानची ओव्हरहेड वायर कापली गेली आहे. बोरिवली रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3,4,5,6,7 आणि 8 वरुन रेल्वे वाहतूक सुरु आहे." पश्चिम रेल्वेकडून बोरिवली स्थानकातील पॉइंट क्रमांक 107,108 आणि 111 च्या दुरुस्तीचं काम सुरु असून वाहतूक पूर्वव्रत करण्याला प्रथम प्राधान्य आहे, असं पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलं आहे.
Due to some technical issues of cable being cut, point no 107/108, point no 111/112 & point no 131/132 are not operational currently therefore Suburban trains not being operated from platform nos 1 & 2 of Borivali Station.
Trains are being operated from platform nos…
— Western Railway (@WesternRly) June 3, 2024
मध्य रेल्वेवर दोन दिवसांच्या मेगा ब्लॉक घेण्यात आल्यानंतर आज दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा असतानाच तांत्रिक बिघाडीमुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर अनेकजण आज जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कामावर पुन्हा रुजू होत असतानाच हा गोंधळ झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.