मुंबई : यंदाच्या वर्षी लांबलेल्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून पतरण्यासाठी गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार महाराष्ट्राच्या काही भागात पोषक वातावरण तयार झालंय. त्यामुळं पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागणार आहे.
यंदा राज्यासह देशभरात समाधानकारक पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. विशेषत: कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड़्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अतोनात नुकसान झालं. त्यातल्या त्यात एक दिलासादायक बाब म्हणजे राज्यात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात सर्वसाधारण सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे.
यंदा सप्टेंबरमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि अखेरच्या आठवड्यातील चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास लांबला. हा परतीच्या पावसाचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक रेंगाळलेला प्रवास आहे.
दरम्यान आजही राज्यातल्या अनेक भागात परतीच्या पावसानं हजेरी लावली. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातल्या अनेक शहरात वीजांसह पाऊस झाला. संगमनेर शहरातील नवीननगर रोड परीसरात तर तळ्याचं रुप आलं होतं. उत्तर पुणे जिल्ह्यात शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर, तालुक्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपलं. तिकडे नाशिक जिल्ह्यात नाशिक शहरासह दिंडोरी आणि येवला तालुक्यात तास दीड तास पावसानं शेतांना तळ्याचं रुप आणलं.