'मुख्यमंत्र्यांना हटवलं तर सरकारचा पाठिंबा काढू'

महाराष्ट्राला फडणवीसांसारखा स्वच्छ प्रतिमेचा आणि धडाडीने काम करणारा मुख्यमंत्री मिळणे अशक्य आहे. 

Updated: Jul 26, 2018, 11:25 PM IST
'मुख्यमंत्र्यांना हटवलं तर सरकारचा पाठिंबा काढू' title=

मुंबई: मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवायचा प्रयत्न झाल्यास आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, असा इशारा अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिला आहे. 

महाराष्ट्राला फडणवीसांसारखा स्वच्छ प्रतिमेचा आणि धडाडीने काम करणारा मुख्यमंत्री मिळणे अशक्य आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. मराठा आरक्षणाचा मुद्दाही लवकरच निकाली निघेल. येत्या दोन ते तीन दिवसांत याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल, असे रवी राणा यांनी म्हटले. 

यावेळी रवी राणा पक्षातंर्गत कुरघोडीचा मुद्दाही उपस्थित केला. एखादी व्यक्ती चांगले काम करत असेल तर पक्षात त्याचे विरोधक तयार होतात. मराठा आरक्षणाचा मुद्दा आल्यापासून विरोधकांच्या या हालचालींना वेग आलाय. मात्र, माझ्यासारखे अपक्ष आमदार मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत.

आम्ही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहून विनंती करू. फडणवीस मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यास भाजपचे नुकसान होईल. शिवसेनाही सरकारमधून बाहेर पडले, असे रवी राणा यांनी सांगितले.