'देशातील सूडाच्या राजकारणाविरोधात आमचा लढा सुरु' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गर्जना

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीत काय ठरलं, वाचा

Updated: Feb 20, 2022, 08:20 PM IST
'देशातील सूडाच्या राजकारणाविरोधात आमचा लढा  सुरु' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गर्जना title=

मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (k Chandrashekar Rao) आज मुंबईत दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत बैठकीबाबत माहिती दिली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.  गेल्या काही दिवसापासून आमची भेट होणार अशा चर्चा रंगल्या होत्या, तो दिवस आज उगवला. देशात सध्या वातावरण गढुळ होत चाललं आहे, राज्यकारभार दूर राहिला, पण सूडाचं राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर सुरु आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सूडाचं राजकारण ही आपल्या देशाची परंपरा नाहीए, आणि हे आमचं हिंदूत्व तर अजिबात नाही, या गोष्टी जर अशाच चालु राहिल्या तर देशाला भविष्य काय आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

देशाचं काय होईल हा विचार कोणीतरी करायला हवा होता तो आजपासून सुरुवात करायला आम्ही सुरुवात केली आहे. देशात राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरले आहेत. राज्य गेलं खड्ड्यात देश गेला खड्ड्यात हा विचार देशाला परवडणारा नाहीए आणि म्हणून एका नव्या विचाराला सुरुवात झाली आहे. थोडासा अवधी लागेल, देशाला एक चांगली दिशा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

देशात परिवर्तनाची गरज
देशातील राजनिती, देशातील विकासाबाबत आणि स्वातंत्र्यानंतर देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आपण महाराष्ट्रात आलो आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली अशी माहिती के चंद्रशेखर राव यांनी दिली.

देशाच्या प्रगतीसाठी, देशात चांगल्या सुविधा आणण्यासाठी देशाच्या विकासाला गती देण्यासाठी, पॉलिसी बदलण्यासह अनेक विषयांवर चर्चा झाली. अनेक विषयांवर सहमती झाली आहे. आगामी काळात एकत्र काम करण्याबाबत सहमती झाली आहे, असं राव यांनी म्हटलंय. 

देशात इतरही काही पक्ष आहेत, त्यांच्याशीही बोलणं सुरु आहे, उद्धव ठाकरे यांचंही बोलणं सुरु आहे. लवकरच आम्ही भेटू आणि पुढची रणनिती ठरवू. आज देशात ज्या प्रकारे राजकारण सुरु आहे त्या बदलाची गरज आहे. देशात मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. एक मजबूत भारत बनवण्यासाठी काम करणार आहोत. महाराष्ट्रातून मोर्चे निघालेले मोर्चे यशस्वी ठरले आहेत. छत्रपती शिवाजी महाज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठा योद्धांकडून या देशाला प्रेरणा मिळाली आहे, त्याच प्रेरणेतून आम्ही पुढची वाटचाल करु असं के चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे.