कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : नाल्यात कचरा टाकला तर मुंबईकरांचा पाणी पुरवठा मुंबई महापालिका खंडीत करणार आहे. दरवर्षीच्या पावसापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून पालिकेकडून नालेसफाई केली जाते. मात्र याच नाल्यात रहिवाशांकडून कचरा टाकला जातो. यापुढे कचरा टाकताना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कारवाईनंतरही कचरा टाकणे सुरुच राहिल्यास संबंधित विभागातील पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे. असे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत.
नाल्याभोवती वसलेल्या झोपड्या, निवासी संकुलातून कचरा थेट नाल्यात टाकला जातो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने झोपडपट्टी, निवास संकुलातून वाहणाऱ्या नाल्याच्या कडेला 'जाळी' व 'फ्लोटिंग ब्रूम' बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लोकांना नाल्यात कचरा न टाकण्याबाबत जनप्रबोधनही करण्यात येणार आहे. वारंवार कचरा टाकला जात असल्यास प्रथम दंडात्मक कारवाई करावी, यासाठी मनुष्यबळाची नियुक्ती करावी, अशा सूचना देखील दिल्या आहेत.
मात्र, तरीही प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित परिसरातील पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे. त्यामुळे नाल्यात कचरा टाकणाऱ्या रहिवाशांना सावध राहण्याची गरज आहे. तसेच पावसाळ्यादरम्यान पाणी साचण्याच्या ठिकाणांचा आणि तिथे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अभ्यास गुणात्मक व संख्यात्मक स्तरावर करण्यात यावा, असे निर्देशही परदेशी यांनी दिले आहेत.
आयुक्त परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या मासिक आढावा बैठकीला अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, उपायुक्त रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.