Heavy Rain : राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (SDRF) 11 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
तसंच बेस स्टेशनवर एनडीआरएफच्या 9 आणि एसडीआरएफच्या 4 अशा एकूण 13 टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.राज्यात कोकणसह अमरावती विभागातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहं. तसंच काही ठिकाणी नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. आवश्यक असणाऱ्या ठिकाणी राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
आज दुपारी 12 वाजेपर्यंत कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 100 मिमी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात मुंबई कुलाबा येथे 117 मिमी तर सांताक्रूझ इथं 124 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मात्र जिल्ह्यातील 2 नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे, वाहतूक अन्य मार्गाने वळण्यात आली आहे.
पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही, मात्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरु असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक बचाव पथके कार्यरत आहेत.