नावाला आघाडी, मतांची फोडाफोडी? शिवसेनेच्या मतांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा डोळा?

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं

Updated: Jun 17, 2022, 08:12 PM IST
नावाला आघाडी, मतांची फोडाफोडी? शिवसेनेच्या मतांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा डोळा? title=

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीचं टेन्शन आणखी वाढलंय.  कारण एकीकडं भाजपनं पाचवा उमेदवार उभा करून आघाडीला पुन्हा आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडं आघाडीमध्येच फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी 11 जादा मतांची गरज आहे. शिवसेना आणि शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांकडे असलेल्या अतिरिक्त मतांची पळवापळवी करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते कामाला लागल्याचं समजतंय. शिवसेना समर्थक आमदारांना फोनाफोनी सुरू झालीय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर ही फोडाफोडी करण्याची वेळ का आलीय? पाहूया विधानपरिषदेचं गणित
2 जागा लढवणाऱ्या शिवसेनेकडे 55 मतं आहेत. शिवाय 7 अपक्ष आमदारांचाही शिवसेनेला पाठिंबा आहे. त्यामुळं शिवसेनेकडं 8 अतिरिक्त मतं आहेत.

राष्ट्रवादीनं 2 उमेदवार उभे केलेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता येणार नसल्यानं राष्ट्रवादीकडे 51 आमदार आणि 2 समर्थक अपक्ष अशी 53 मतं आहेत. राष्ट्रवादीला आणखी एका मताची गरज आहे.

सर्वात मोठी अडचण काँग्रेसची आहे. केवळ 44 मतं असताना काँग्रेसनं 2 उमेदवार रिंगणात उतरवलेत. काँग्रेसला 10 जादा मतांची गरज आहे.
तर भाजपकडे 106 आणि समर्थक 6 अशी 112 मतं असताना, भाजपनं 5 उमेदवार रिंगणात उभे केलेत. त्यामुळं भाजपला 23 अतिरिक्त मतांची गरज आहे.

विधानपरिषदेचं हे गणित लक्षात घेतलं तर राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यातच मतांची पळवापळवी सुरू झाल्याचं समजतंय. राष्ट्रवादीच्या वतीनं स्वतः अजित पवार मैदानात उतरलेत. तर भाई जगतापांनी देखील भेटीगाठी सुरू केल्यायत.

भाऊ आणि भाई यांच्यातली ही बिघाडी भाजपच्या पथ्यावर पडू शकते, अशी चर्चा सुरू झालीय. राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांच्या विजयामुळं भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय... आघाडी समर्थक अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांची मतं खेचण्यासाठी भाजपचे चाणक्यही कामाला लागलेत. आघाडीतल्या दोघांच्या भांडणात पुन्हा भाजपचा लाभ होणार का, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय.