उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे रुळालगत भाजी लागवडीला मनाई

आता हिरवं विष ताटात येणार नाही.

Updated: Dec 4, 2019, 06:48 PM IST
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे रुळालगत भाजी लागवडीला मनाई title=

रुचा वझे, झी मीडिया, मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या रुळांलगतच्या भूखंडावर भाजी पिकवली जाते. हा भाजीपाला पिकवण्यासाठी गटाराच्या पाण्याचा सर्रास वापर केला जातो. गटाराच्या पाण्यावर पिकवलेली ही भाजी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं समोर आलं होतं. भाजीबाजारात ताज्या भाजीकडं पाहून लोकं संशयानं पाहू लागली होती. 

मुंबई उच्च न्यायालयानंही रेल्वे प्राधिकरणाला अशा गटाराच्या पाण्यावर भाज्या पिकवू नका असे आदेश दिले होते. त्यानुसार रेल्वेनं आता उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. रेल्वेनं दादर आणि परळ स्टेशनच्या पट्ट्यातील मोकळ्या जागेत गटाराच्या पाण्यावर भाजी लागवडीला मनाई केली आहे. सध्या जिथं भाजी पिकवली जाते तो पट्टा पुन्हा भाजी लागवडीसाठी दिला जाणार नाही असं रेल्वेनं सांगितलं आहे. गटाराच्या पाण्यावर भाजी पिकवता येणार नाही असं रेल्वेनं सांगितलं आहे.

थोड्याशा नफ्यासाठी सामान्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता. गटाराच्या पाण्यावर पिकवलेल्या भाज्या माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहेत असं तज्ज्ञ सांगतात.

दादर परळपासून आता सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वेच्या बदलापूरपर्यंत आणि पश्चिम रेल्वेच्या विरारपर्यंतचा डर्टी भाजीचा कारखाना बंद होईल अशी अपेक्षा आहे. थोडीशी महागडी भाजी घ्या पण रेल्वे रुळांलगत पिकलेलं हिरवं विष विकत घेऊ नका.