मुंबई : सरकारने दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे तो पालक आणि तज्ञ् यांच्याशी बोलून घेतला आहे. सरकार जो काही निर्णय घेते ते विद्यार्थी यांच्या हितासाठीच असते. त्यामुळे या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
'हिंदुस्थानी भाऊ' याच्या पोस्टनंतर दोन दिवसांपूर्वी हजारो शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावी तसेच या परीक्षा online घेण्यात याव्यात अशी मागणी केली होती. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर तसेच नागपूर, जळगाव, अमरावती, नाशिक आदी विविध भागात त्यांनी रास्ता रोखून धरला होता.
यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड निर्णय बदलणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत असे स्पष्ट करून या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
मुलांनी अभ्यास करावा. तुमच्या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे. सरकार सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून निर्णय घेतो. आम्ही सुरुवातीपासून सांगतेय परीक्षा ऑफलाईन होणार. तज्ञांचेही तेच मत आहे. मागील ३ महिने आम्ही ऑफलाईन परीक्षेची तयारी करतोय. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. शासन त्यांच्या पाठिशी आहे.
याबाबत शिक्षण मंडळ आजच भूमिका स्पष्ट करणार असून विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.