आमची विनाकारण बदनामी केली जातेय; सनातनचा आरोप

आतापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये सनातनचे नाव गोवण्यात आले.

Updated: Aug 27, 2018, 03:41 PM IST
आमची विनाकारण बदनामी केली जातेय; सनातनचा आरोप title=

मुंबई: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेला वैभव राऊत व अन्य लोकांचा आमच्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा सनातन संस्थेतर्फे करण्यात आला आहे. सनातनचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनिल घनवट यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सनातनवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. 

या सर्व प्रकरणात सनातन संस्थेला विनाकारण गोवण्यात येत आहे. तपास पूर्ण न झाल्यामुळे पोलीस किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजूनही कोणत्याही संस्थेचे नाव घेतलेले नाही. मात्र, अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस) विनाकारण आम्हाला बदनाम करत असल्याचा आरोप सनातनने केला. 

आतापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये सनातनचे नाव गोवण्यात आले. मात्र, कोणत्याही आरोपपत्रात सनातनचा उल्लेख नाही. मग विनाकारण सनातनचे नाव घेऊन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी का केली जात आहे, असा सवाल चेतन राजहंस यांनी उपस्थित केला. सोशल मीडियावर सनातनविरोधात अपप्रचार केला जात आहे. प्रसारमाध्यमांतील लोक या अपप्रचाराला बळी पडत असून त्यामुळे खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, असा आरोपही सनातनने केला.