मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत २०२२-२३चा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे तर भाजपने त्याचे स्वागत केलंय.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प देशाला बलशाली करणारा असल्याचं म्हटलं आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आगामी पंचवीस वर्षातील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, हा निवडणूक संकल्प असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प आहे. आर्थिक मापदंडांवर अधिक संतुलित, समावेशी आणि विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, असं म्हटलं आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन देशाला आत्मनिर्भर आणि संपन्न बनविण्यासाठीचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. आगामी पंचवीस वर्षांतील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणाऱ्या या अर्थसंकल्पाचे स्वागत करत आहे असं म्हटले आहे.
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवून देशात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. गुंतवणूक, उत्पादन, शेती, शिक्षण, सामाजिक कल्याण, ग्रामविकास, शहरांचा विकास, वैद्यकीय सुविधा अशा सर्व क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देश आर्थिकदृष्ट्या प्रगत व्हावा आणि त्याचबरोबर स्वदेशी उद्योगांना चालना देऊन देश आत्मनिर्भर व्हावा यासाठी महत्त्वाच्या तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, असे सांगितले आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर टीका करताना हा अर्थसंकल्प नसून निवडणूक संकल्प असल्याची टीका केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, 'देशाची संपत्ती काही मोजक्या उद्योगपतींच्या घशात कशी जाईल यासाठी या अर्थसंकल्पात प्रयत्न केलेला दिसत आहे. 'सब का साथ, सब का विश्वास' ही फक्त घोषणाच असून त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसत नाही. अर्थमंत्री निर्मला सितारमन वारंवार आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत होत्या. पण ज्या टॅबच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प सादर करत होत्या त्या टॅबची निर्मितीही भारतात झालेली नाही.'
या अर्थसंकल्पातून शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, नोकरदार, तरुणवर्गासह सर्व घटकाची घोर निराशा झाली असून देशातील जनतेला यापुढेही कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल असे दिसते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.