नवी दिल्ली : २०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर केला. प्रथमच मुंबईला काहीसे झुकते माप मिळाले आहे. मुंबईत ११ हजार कोटी रुपये खर्चून ९० किमी रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे.
रेल्वेसाठी १ लाख ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. संपूर्ण रेल्वे ब्रॉडगेज करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वे सुरक्षेला सरकारचे प्रथम प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई रेल्वेचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. ९० किलोमीटरपर्यंत मार्ग वाढवण्यात येणार आहे. तसेच ४० हजार कोटी रुपये एलिव्हेटेड कॉरिडोरच्या उभारणीसाठी खर्च केले जाणार आहेत. मोदींच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या मार्गाचे काम सुरू करण्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत, त्या पूर्ण करण्यात येतील. बडोदा येथे कर्मचारी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती जेटली यांनी दिली.
यावर्षी रेल्वेची ७०० नवीन इंजिने आणि ५१६० नवीन डबे तयार करण्यात येणार आहेत. सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यावर्षी ६०० रेल्वे स्थानके अत्याधुनिक करण्यात येणार असून, स्थानके अद्ययावत आणि सरकते जिने बसवण्यात येणार आहेत. तसेच वाय-फाय सुविधाही देण्यात येणार आहे. रेल्वे रुळ देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांवरही विशेष लक्ष दिले जाईल. ३६०० किलोमीटर रुळांचं नुतनीकरण करण्यात येणार आहे, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
३ हजार ६०० किमीचे नवीन मार्ग असून पुढील दोन वर्षांत ४२६७ मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केली जातील. १८००० किमी रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. तसेच बंगळुरमधील उप-नगरीय रेल्वे विकासासाठी १७,००० कोटींची तरतूद करण्यात आलेय.