अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला

अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला

Updated: Dec 20, 2019, 03:55 PM IST
अतिक्रमणावर कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला title=

नालासोपारा : नालासोपारा पूर्व गालानगर परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांनी चाकूने हल्ला करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. नालासोपारा शहरात अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आज १२ वाजेच्या सुमारास अतिक्रमण अधिकारी गोकुळ पाटील आणि त्यांच्या पथकाने कारवाईची मोहीम सुरू केली होती. 

नालासोपारा पूर्व गालानगर येथील फेरीवाल्यांनी कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकावर शिवीगाळ आणि मारहाण केली. या घटनेत जखमी कर्मचाऱ्यांना उपचाराकरता जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले असून घडलेल्या प्रकाराबाबत हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात तुळींज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याआधी ही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या निमित्ताने पुन्हा एकदा पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.