मुंबई : देशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात जर लागली तर नेतृत्व करण्यास उद्धव ठाकरे सक्षम आहेत, आणि ते करतील याची मला खात्री आहे', अशा शुभेच्छा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिल्या होत्या.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी टोमणा मारलाय. 'संजय राऊत यांनी शुभेच्छा देताना तेवढं राखून ठेवलं असेल की उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही', असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
'मी माननीय मुख्यमंत्र्यांना फोनवर शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना जी संधी मिळाली आहे, त्या संधीचा उपयोग करुन राज्याची जास्तीत जास्त सेवा करता येईल, ती करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, आणि इश्वाराने त्यांना तसे आशिर्वाद द्यावेत' अशा शुभेच्छा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या.
'मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे की वाढदिवस साजरा करू नका, ते राज्याचे नेतृत्व करत आहेत. मी त्यांना गेली पंचेचाळीस वर्षे ओळखतो. मुख्यमंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेत. मात्र या नेतृत्वाकडून भविष्यात देशाला देखील अपेक्षा आहेत. हे माझं म्हणणं मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो आजच्या दिवशी, देशाला सुद्धा उद्धव ठाकरे यांचा संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात जर लागली तर नेतृत्व करण्यास उद्धव ठाकरे सक्षम आहेत. आणि ते करतील याची मला खात्री आहे', असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हटलं आहे.