Pune Bypoll Election Results 2023: '...तर देशसुद्धा बाहेर पडायला वेळ लागणार नाही' कसबा विजयावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Kasba Chinchwad By Election Results 2023: कसबा पोटनिवडणुकीत भाजपला पराभव स्विकाराला लागला. यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे. भाजपविरोधी मतं वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

Updated: Mar 2, 2023, 02:19 PM IST
Pune Bypoll Election Results 2023: '...तर देशसुद्धा बाहेर पडायला वेळ लागणार नाही' कसबा विजयावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया title=

Kasba Peth-Chinchwad Bypoll Election Results 2023: '...तर देशसुद्धा बाहेर पडायला वेळ लागणार नाही' कसबा विजयावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया : कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Peth Election) महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी दणदणीत विजय मिळवला. तब्बल 28 वर्षांनंतर भाजपाला मतदारसंघ गमवावा लागला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभव स्विकारावा लागला. कसबा पोटनिवडणुकीतील विजायवर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कसब्यात पोटनिवडणूक जिंकल्याचा आनंद झाला आहे. इतक्या वर्षांच्या भ्रमातून कसबा मतदारसंघ बाहेर पडत असेल तर देशसुद्धा बाहेर पडायला वेळ लागणार नाही. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीतील निकालही बोलके आहेत. पोटनिवडणुकीतही आशादायी चित्र आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 

वापरा आणि फेका ही भाजपची निती आहे, शिवसेनेबाबतही भाजपने तेच केलं, देशातही त्यांनी तेच केलं. कसब्यातही टिळकांच्या कुटुंबाचा वापर केला. गिरीश बापट यांनाही तब्येत ठिक नसतानाही त्यांना प्रचारात आणलं. गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्याबाबतही भाजपने तेचं केलं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार आघाडीवर असल्या तरी भाजपाच्या विरोधातील मतं वाढतायत, राष्ट्रवादी आणि अपक्षांच्या मतांची बेरीज केली तर ती भाजपापेक्षा जास्त असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलय.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आनंद

सर्वोच्च न्यायालायाने जो निकाल दिला आहे तो देशातील लोकशाही जिंवत ठेवण्याच्या दृष्टीने महत्ताचा आहे. निवडणूक आयोगाची नेमणूक प्रक्रिया बदलली गेली पाहिजे, त्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाचा निकाल महत्त्वाचा आहे. बेबंदशाहीला रोखण्याची गरज नाही, वेळीच रोखलं नाही तर काळ सोकावेल आणि काळाबाहेर हुकुमशाहीदेखील सोकावेल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल स्वागतार्ह आहे. निवडणूक आयोगवर किती विश्वास ठेवायचा हे चित्र आता बदलतंय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. 

सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीत याचे पडसाद दिसतील.  निवडणूक आयोग नाही निवडणूक अयोग्य आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आमचा दावा आता सुप्रीम कोर्टात आहे. आज त्या आशेला अंकूर फुटलेला असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.