गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावरुन उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका

देशभरात नव्या चर्चांना उधाण

Updated: Dec 10, 2018, 07:44 PM IST
गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावरुन उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका title=

मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर सरकारवर यावरुन टीका होत आहे. राजीनाम्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांनी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याची चर्चा होतीच. माणसं नेमणं आणि काढणं यात सरकारने यात वेळ घालवू नये. सरकारने एकदाच काय तो संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात घ्यावा. ही नाटकं थांबली तरी चालतील. एकूण काय तो प्रकार देशासमोर उघड आहे. अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे. 

हिवाळी अधिवेशनाच्य़ा आधी उर्जित पटेल यांच्या या राजीनाम्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सोमवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजकीय आणि आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून भविष्यात आम्हाला उर्जित पटेल यांची खूप मोठी उणीव जाणवेल, असे सांगितले. डॉ. उर्जित पटेल हे अत्यंत प्रतिभावान अर्थतज्ज्ञ होते. त्यांना व्यापक अर्थशास्त्रीय समस्यांची खोलवर जाण होती. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला एक विशिष्ट दिशा दिली, असे कौतुकौद्गार मोदींनी काढले. 

उर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर होते. रघुराम राजन पायउतार झाल्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये पटेल यांच्याकडे तीन वर्षांसाठी गव्हर्नरपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. २०१९ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता. मात्र, गेल्या काही काळापासून रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयातील उच्चपदस्थांमध्ये सातत्याने खटके उडत होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय आर्थिक निर्णय घेण्याच्या नादात सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाकयुद्धच पेटले होते. अखेर १९ नोव्हेंबरला रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या झालेल्या बैठकीत यावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला होता. मात्र, उर्जित पटेल यांनी आज अचानक राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला.