Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळे राज ठाकरे (Raj Thckeray) यांना शिवसेना सोडावी लागली, हा इतिहास महाराष्ट्र जाणतो. राज ठाकरे यांनी मनसेचं नवनिर्माण केल्यापासून दोघा भावांमधून विस्तवही जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण आता शिवसेनेची सत्ता असताना आणि स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 40 हून अधिक आमदारांनी बंड केल्यानं शिवसेना अडचणीत सापडलीय.
शिवसेना हा पक्षच ठाकरेंच्या हातून हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू झालेत. शिवसेनेतला हा सत्तासंघर्ष टोकाला गेलेला असतानाच, आता उद्धव आणि राज या दोघा भावांनी एकत्र यावेत, अशी मागणी पुढं येत आहे. कधीकाळी मनसेत असलेल्या आणि आता राष्ट्रवादीत स्थिरावलेल्या रुपाली ठोंबरे पाटलांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय.
राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्ता संघर्षाला महाराष्ट्रातली जनता वैतागली आहे. उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील हे दोघेही हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच लेकरं आहेत. अशा परिस्थितीत हिंदुत्व हिंदुत्व म्हणणाऱ्यांनी संकटात सापडलेल्या भावासाठी समोर यावे आणि पूर्वीची भांडणे विसरून एकत्र यायला पाहिजे हे हिंदुत्व शिकवते. ज्याप्रमाणे लक्ष्मण रामासाठी उभा राहिला होता तसंच हिंदुत्व लोकांना शिकवणाऱ्यांनी भावासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.
एवढंच नव्हे तर सध्याच्या बिकट प्रसंगात उद्धव आणि राज यांनी एकत्र यायला हवं, अशी भावना मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनीही बोलून दाखवलीय...
राज ठाकरेंनी मशिदीवरचे भोंगे हटवण्याची मागणी करून, कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. राज ठाकरे नकली हिंदुत्ववादी असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला.
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा पुढं ढकलण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी अयोध्या दौरा केला. यानिमित्तानं पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पेटली. त्यामुळं उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येतील, अशी शक्यता फारच कमी आहे. पण राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नाही.