मुंबई: देशभरात सत्तेवर असलेल्या भाजपसमोर विरोधकांचा आवाज अगदीच प्रभावहीन असल्याचे चित्र आहे. मात्र, असे असले तरी, सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची भूमिका वटवणारी शिवसेना अनेक मुद्द्यांवर सरकारवर टीका करताना दिसते. कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेवरून निर्माण झालेल्या घटनात्मक आणि राजकीय पेचावरूनही शिवसेनेने भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधकांच्या मानेवर सुरी फिरवणारी यंत्रणा सरकारच्या मुठीत आहे, असा आरोप करतानाच कर्नाटकमध्ये 'मनी व मसल्स'च्य़ा जोरावर भाजप पारदर्शी कारभार करेल, असा टोलाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्य़ा दै. सामनामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सुप्रीम दणका' या मथळ्याखाली एक लेख लिहीला आहे. या लेखाच्या माध्यमातून ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. 'कर्नाटकात भाजपला ‘सुप्रीम’ दणका बसला आहे. तरीही त्या पक्षाचे एकंदर धोरण पाहता बहुमत चाचणीच्या वेळेला काँग्रेस, जेडीएसचे आमदार फोडून त्यांना आपल्या बाजूने वळवले जाईल किंवा विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस, जेडीएसचे काही आमदार गैरहजर ठेवले जातील. अशातऱ्हेने स्वच्छ व पारदर्शक कारभाराचे वचन कर्नाटकात पाळले जाईल! हे सर्व भाजप करू शकेल, कारण ‘मनी व मसल्स’ ही हत्यारे आज त्यांच्या हाती आहेत व विरोधकांच्या मानेवर सुरी फिरवणाऱ्या सरकारी यंत्रणा मुठीत आहेत. हे सर्व प्रकार येडियुरप्पा यांनी २००८ साली केले आहेत, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कर्नाटकात अपक्ष फक्त दोन निवडून आले आहेत. त्यातील एक अपक्ष आर. शंकर याने गेल्या ४८ तासांत चार वेळा बेडुकउड्या मारल्या आहेत. आता बहुमत चाचणीच्या वेळी काँग्रेस, जेडीएसचे किती बेडुक ‘डराव’ न करता डबकी बदलतात ते पाहायचंय. देशातील राजकारणातून नीतिमत्ता, नैतिक बंधने, पक्षनिष्ठा, विश्वास वगैरे गोष्टी कधीच हद्दपार झाल्या आहेत. राजकारणाला झालेली ‘आयाराम-गयाराम संस्कृती’ची बाधा पक्षांतरविरोधी कायदा होऊनही दूर झालेली नाही. मागील काही दशकांत देशातील राजकारणाचा दर्जा कमालीचा घसरला आहेच, पण गेल्या चार वर्षांत तो रसातळाला गेला आहे. काळय़ा पैशांशिवाय पान हालत नाही अशी राजकीय परिस्थिती निर्माण करणारेच काळ्या पैशांविरुद्ध मांडीवर थाप ठोकतात तेव्हा आश्चर्य वाटते. कर्नाटकात तेच घडत आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.