मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रत्येक उमेदवाराला आपली मिळत आणि संपत्ती जाहीर करावी लागते. मात्र, त्याआधी 'झी २४ तास'च्या हाती सर्वाधिक कमाई करणाऱ्या श्रीमंत आमदारांची नावे आली आहेत. सर्वाधिक कमाई असलेले चार आमदार हे महाराष्ट्रातील आहेत. सर्वाधिक श्रीमंत नव्हे तर वर्षाकाठी सर्वाधिक कमावणाऱ्या देशातल्या २० आमदारांपैकी ४ आमदार महाराष्ट्रातले आहेत.
पहिल्या क्रमांकावर आहेत, मुंबईतल्या मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा. वार्षिक कमाई ३३ कोटी २५ लाख रुपये आहे. लोढा ग्रुपमध्ये पगारदार असे लोढांचे वर्णन करण्यात आले आहे. देशात लोढांचा क्रमांक आहे दुसरा आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर आहेत, बार्शीचे आमदार आणि नुकतेच शिवसेनेत आलेले दिलीप सोपल. वार्षिक कमाई ९ कोटी ८५ लाख रुपये आहे. सोपल वकील आणि शेतकरी आहेत. देशात त्यांचा क्रमांक सहावा लागतो.
तिसरा क्रमांक पनवेलच्या प्रशांत ठाकूरांचा. वार्षिक कमाई ५ कोटी ४१ लाख रुपये. ते शेतकरी असून मशीन्स भाड्याने देणे हा प्रशांत ठाकुरांचा व्यवसाय आहे. ते देशात सतराव्या क्रमांकावर आहेत. तर सर्वाधिक कमाई असणाऱ्या आमदारांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण कऱ्हाडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण. त्यांचे वार्षिक उत्पन्न आहे ४ कोटी ३४ लाख रुपये आहे. त्यांनी शेतकरी असल्याचा उल्लेख पृथ्वीराज चव्हाणा यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण देशात २० व्या क्रमांकावर आहेत. मावळत्या तेराव्या विधानसभेतले सर्वाधिक कमाई असलेले हे आमदार. आता चौदाव्या विधानसभेत कोण जास्त कमाई करणार याकडे लक्ष लागले आहे.