मुंबई : घाटकोपर इमारत दुर्घटनेत १७ जणांचा नाहक बळी गेलाय. या घटनेची 'पारदर्शक' चौकशी करण्याची मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. मुख्यमंत्री यांनी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील समितीमार्फत चौकशी करणार, असल्याचे आश्वासन दिलेय, अशी माहिती राणे यांनी दिली.
घाटकोपर येथील इमारत दुर्घटनेला सुनील शितपइतकेच मुंबई महापालिकेचे अधिकारीही जबाबदार आहेत. त्यामुळे चौकशी समितीत पालिकेचे अधिकारी असतील तर ते अधिकारी दोषी अधिकाऱ्यांना वाचविण्याच्यादृष्टीने अहवाल तयार करतील, अशी शंका आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केली.
या दुर्घटनेची चौकशी एखादे निवृत्त न्यायाधीश, आयएएस अधिकारी, किंवा सीआयडी मार्फत 'पारदर्शकपणे' करावी अशी मागणी आपण केल्याचे त्यांनी सांगितले. या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे.
घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी विरोधी पक्षाकडून ९७ अन्वये विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावरील चर्चेच्यावेळी आमदार नितेश राणे यांनी चौकशीची मागणी केली. या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत याप्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली. या समितीचा अहवाल पंधरा दिवसात येणार आहे. मात्र ही समिती एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली काम करून त्याविषयीचा अहवाल तयार करेल, असे जाहीर आश्वासन दिलेय.