दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या वाढत्या लोकसंख्ये सोबतच त्यांना मिळणाऱ्या वाहतुकीच्या पर्यायात देखील वाढ होताना दिसत आहे. रेल्वे आणि बस, रिक्षा, टॅक्सी या पारंपारिक वाहतुकींच्या पर्यांयात गेल्या काही वर्षांत वाढ झालेली दिसली. मेट्रो, मोनो यामुळे मुंबईकरांना वाहतुकीचे नवे पर्याय मिळाले. कोस्टल रोडचा पर्यायही काही दिवसांनी मुंबईकरांसमोर येईल. या आधुनिकिकरणात ट्रामचा प्रवाशांना विसर पडला आहे. पण आता या ट्रामच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळणार आहे. मुंबईकर आणि पर्यटकांना पुन्हा एकदा ट्राम पाहता येणार आहे.
मुंबई महानगर पालिकेकडून जुन्या ट्रामचे नूतनीकरण करण्यात येत आहे. नवी मुंबईतील गोदामात ट्राम तयार असून मुंबईकरांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. सीएसएमटी रेल्वे कार्यालयाबाहेरील भाटीया उद्यानात लवकरच ही जुनी ट्राम पर्यटकांसाठी ठेवण्यात येणार आहे. पूरातत्व समितीकडून याची पाहणी झाल्यानंतर पर्यटकांसाठी खुली करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.