मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येण्याच्या उंबरठ्यावर आहे. अनेक महिन्यांनंतर राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालीय. राज्यात दिवसभरात दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईचा आकडाही एक हजारांपलिकडे गेला आहे.
मुंबईत आज कोरोना रुग्णसंख्येने हजाराचा आकडा पार केला. गेल्या चोवीस तासात मुंबईत 1 हजार 377 नव्या कोरोना रुग्णआंची नोंद झाली आहे. रविवारी मुंबईत 922 रुग्ण आढले होते, त्यानंतर सोमवारी 809 रुग्ण सापडले. आज यात आणखी मोठी वाढ झाली आहे.
गेल्या चोवीस तासात 338 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे मुंबईत बरं झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्के झाला आहे. रुग्ण दुपटीचा दरही घसरुन 841 दिवसांवर आला आहे. यामुळे मुंबई पालिका प्रशासनाची चिंता वाढली असून मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे.
राज्यातही रुग्णसंख्येत वाढ
राज्यात 2 हजार 172 रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 22 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात एकही ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही.
कठोर निर्बंधांचे संकेत
वाढलेल्या रुग्णसंख्येचा पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनीही राज्यात कठोर निर्बंधाचे संकेत दिले आहेत. तसंच जानेवारी आणि फेब्रुवारीत रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यताही राजेश टोपेंनी वर्तवलीय. आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि कोरानाचे नियम पाळले पाहिजेत असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.