धक्कादायक वास्तव, गुन्हेगारीत होतोय अल्पवयीन मुलांचा वापर!

धक्कादायक बातमी. हत्येप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक झाली. मात्र, गुन्हेगारी विश्वात ही लहान मुले आली कशी, याची माहिती घेतली असता  गुन्हेगारी विश्वात सध्या हा नवा ट्रेण्ड आलाय.

Updated: Jan 11, 2018, 11:36 PM IST
धक्कादायक वास्तव, गुन्हेगारीत होतोय अल्पवयीन मुलांचा वापर! title=

मुंबई : धक्कादायक बातमी. शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक झाली. मात्र, गुन्हेगारी विश्वात ही लहान मुले आली कशी, याची माहिती घेतली असता  गुन्हेगारी विश्वात सध्या हा नवा ट्रेण्ड आहे, असे स्पष्ट झालेय. पुण्यातल्या सामान्य कुटुंबातील एका लहान मुलाने ही हत्या केली. आणखी धक्कादायक म्हणजे आपला मुलगा असं काही करतोय, याचा जराही अंदाज त्याच्या आई वडिलांना नव्हता. 

मुलांवर लक्ष ठेवा

तुमची मुलं करतात काय ?  तुमच्या मुलांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवा. हे सगळं सांगण्याची पुन्हा वेळ आलीय. कारण समोर आलंय एक खळबळजनक वास्तव. कांदिवलीत शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आलीय. अशोक सावंत यांच्या हत्येइतकाच किंवा त्याहीपेक्षा गंभीर हा मुद्दा आहे.

मुलांच्या शोधात टोळ्या

तू एवढं काम कर, तुझ्या पुढच्या आयुष्याचं कल्याण होईल, असं सांगत या मुलाला चक्क खून करायला भाग पाडलं. धक्कादायक म्हणजे पुण्यात राहणारा हा मुलगा विज्ञान शाखेत बारावीत शिकत होता.  गुंडांच्या टोळ्या अर्धवट वयात असलेल्या मुलांच्या शोधात असतात. परिस्थितीनं, गरिबीनं पिचलेली, अन्यायाची भावना असलेली मुलं हेरली जातात. त्यांना व्यसन आणि पैशाचं आमिष दाखवलं जातं. अवखळ वयातल्या मुलांचं ब्रेनवॉश केलं जातं आणि थोड्याशा रकमेच्या आमिषानं या मुलांकडून हत्या घडवल्या जातात. 

अल्पवयीन मुलानं कसा केला खून ?

अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून या मुलाला हेरण्यात आलं. गेलं वर्षभर या मुलाचा पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास सुरू होता. या हत्येतला मुख्य सूत्रधार जगदीश पवार या मुलाला वारंवार भेटायचा. दोघं एकत्र दारू प्यायचे, हुक्का ओढायचे. क्राईममध्ये पैसा आहे, असं जगदीशनं या मुलाच्या मनावर ठसवलं. काही रकमेचं आश्वासन देत त्याच्या हाती सुरा टेकवण्यात आला. अशोक सावंत यांच्यावर या अल्पवयीन मुलानं वार केले आणि तो पुण्याला निघून गेला.

कमी पैशांत होतं काम 

सध्या गुन्ह्यांमध्ये लहान मुलांचा वापर करण्याचा नवा ट्रेण्ड गुन्हेगारी विश्वात आहे.  लहान मुलांचा वापर का ? गंभीरपेक्षाही गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलांना जास्त शिक्षा होत नाही. पोलीस अल्पवयीन मुलांवर संशय लवकर घेत नाहीत. त्यामुळे गुन्हा करुन पुरावे नष्ट करण्यासाठी आणि पळून झाण्यासाठी वेळ मिळतो. कमी पैशांत काम होतं.

आपला मुलगा काय करतो  

अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी ज्या मुलाला अटक झाली, त्याच्या पालकांना आपला मुलगा काय करतो, याची जराही कल्पना नव्हती. मित्रांबरोबर मुंबईला फिरायला जातो, असं सांगून तो मुंबईला जायचा. मुलगा सहज म्हणून घरातून जातो आणि एक खून करुन येतो. हे अत्यंत धक्कादायक आहे.

तुमच्या मुलांकडे नीट लक्ष ठेवा  

त्यांचे मित्र -मैत्रिणी कोण आहेत, हे जाणून घ्या. ते वाईट संगतीत नाहीत ना, याची खात्री करा. ते व्यसनांच्या आहारी जात नाहीत ना, हे वेळोवेळी तपासून पाहा, त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधा. ज्या वयात मुलांची मनं आकार घेत असतात, त्याच वयात पाय निसटण्याची शक्यता जास्त. गुन्हेगारी विश्वातले नराधम अशा सावजांच्या शोधातच असतात. त्यांच्यापासून तुमची मुलं सुरक्षित ठेवा.