मुंबई-बदलापूर प्रवास केवळ दीड तासांत; एलिव्हेटेड रस्त्याचं काम सुरु

३३.८ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रस्ता तयार करण्यात येत आहे.

Updated: Dec 12, 2019, 09:15 AM IST
मुंबई-बदलापूर प्रवास केवळ दीड तासांत; एलिव्हेटेड रस्त्याचं काम सुरु title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुंबई ते बदलापूरदरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांसाठी चांगली बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) एलिव्हेटेड रस्ता तयार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या नव्या मार्गामुळे दोन्ही  शहरांदरम्यान लागणारा प्रवासाचा वेळ कमी होऊन १ तास ३० मिनिटांपर्यंत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या मुंबई ते बदलापूर शहरांदरम्यान लागणार वेळ हा २ तासांहून अधिक आहे.

एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐरोली ते कटाई नाका, डोंबिवलीपर्यंत ३३.८ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड रस्ता तयार करण्यात येत आहे. एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त, संजय खंदारे यांनी, एलिव्हेटेड रस्त्याचं ३० टक्के काम पूर्ण झाल्याचं सांगितलं. मुंबई-बदलापूर मार्ग २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याचं ते म्हणाले.

एलिव्हेटेड रोडला राष्ट्रीय महामार्ग ४शी जोडण्यासाठी मुंब्रा बायपासजवळ एक बोगदा तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते कल्याण आणि बदलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी वेळेची मोठी बचत होणार आहे.

या बोगद्याचा सर्वाधिक फायदा कल्याण आणि नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या लोकांना होणार आहे. सध्या कल्याण ते ऐरोली प्रवासासाठी जवळपास १ तास १५ मिनिटांचा वेळ लागतो. बोगदा तयार करण्यात आल्यानंतर हा वेळ ४५ मिनिटांवर येणार आहे. या बोगद्यामुळे नवी मुंबईतील लोक रबाळेहून थेट मुंब्रा बायपासजवळ पोहचणार आहेत. 

ठाणे ते कटाई नाका दरम्यानचा रस्ता वाहतूक कोंडीसाठी ओळखला जातो. मात्र आता या नव्या मार्गामुळे, थकवणार्‍या प्रवासाऐवजी प्रवाशांना सहज मार्ग मिळण्याची अपेक्षा आहे.