मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीत धुसफूस पाहण्यास मिळाली. राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या बदललेल्या नियमांना मंजूरी दिली नाही. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहले होते. या पत्रातील भाषेवर राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे.
''विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी तुम्ही 11 महिन्यांचा कालावधी लावला. 6 आणि 7 नियमात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. हे बदल दिर्घकालीन प्रभाव टाकणार असणारे असल्याने ते कायदेशीर तपासणे आवश्यक होते. विधीमंडळाला असलेल्या विशेष अधिकारावर मी कधीही प्रश्न उपस्थित केला नाही. ही प्रक्रिया प्राथमिक दृष्या बेकायदेशीर आहे त्याला मी परवानगी देऊ शकत नाही.'' असे कोश्यारी यांनी म्हटले.
''पत्र वाचून मी व्यथित झालोय, निराश झालोय, असे म्हणत पत्रात जी मुदत देण्यात आली होती, त्यावरही राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.
"माझ्यावर कोणताही निर्णय घेण्यासाठी दबाव आणणं योग्य नाही. तुमच्याकडे असे अधिकार नाहीत. मी घटनेच्या चौकटीत राहून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बांधील आहे.
मला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो योग्य असला पाहिजे. सर्व बाबींचा विचार करुन मला निर्णय घ्यावा लागतो. यासाठी तुम्ही माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही.", असंही राज्यपाल म्हणाले आहेत.