मुंबई : मागील सात महिन्यांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला चेंबूर येथील अमर महल उड्डाण पूल हा वाहनांसाठी दोन्ही मार्गिका खुल्या झाल्या आहेत. यामुळे वाहतूक कोंडी पूर्णतः सुटणार आहे. या पुलाच्यावरून मेट्रो प्रस्तावित असल्याने उड्डाण पुलाची उंची ही कमी करण्यात आली आहे. तर अजूनही या मार्गिकेवर रेती पडलेली असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमर महल उड्डाण पुलाचे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या बाजूवरील दोन्ही सांधे निखळले होते. त्यामुळे हा पूर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र, काही तांत्रिकबाबीमुळे दुरुस्तीचे काम रखडले होते. त्यामुळे सात महिने या पुलावरुन वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी होत होती. 1992 मध्ये 60 मीटर लांबीचा हा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला होता.