दीपक भातुसे, झी मिडिया, मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कधी नव्हे एवढा सस्पेन्स निर्माण झालाय. सत्ताधारी एनडीएचा उमेदवार कोण असेल, विरोधकांचा उमेदवार कोण असेल हे अजूनही गुलदस्त्यातच आहे... कोण असू शकतील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार, पाहूयात हा रिपोर्ट....
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा उत्तराधिकारी कोण, याबाबत कधी नव्हे एवढा सस्पेन्स निर्माण झालाय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायची शेवटची तारीख आहे 28 जून. त्यासाठी केवळ 12 दिवस उरलेत. मात्र ना सत्ताधारी पक्षानं आपला उमेदवार निश्चित केलाय, ना विरोधकांनी... शिवसेनेकडून आधी मोहन भागवत आणि आता स्वामीनाथन यांचं नाव पुढं करण्यात आलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या नावाला सहमती दर्शवली आहे.
मधल्या काळात शरद पवारांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र स्वतः पवार यांनी त्याचा अनेकदा इन्कार केला. रतन टाटा, झारखंडच्या राज्यपाल आणि आदिवासी असलेल्या द्रौपदी मुर्मू, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सुषमा स्वराज यांचीही नाव मधल्या काळात चर्चेत होती. राष्ट्रपतीपदाची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळंच आता या निवडणुकीत सर्वसहमती बनवण्यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केलेत. त्यादृष्टीनं थेट विरोधकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात झालीय. भाजपच्या समितीनं शुक्रवारी सोनिया गांधींची भेट घेतली. तर व्यंकय्या नायडूंनी शरद पवारांशी फोनवर चर्चा केली.
एकीकडे विरोधकांची मनधरणी करतानाच मित्रपक्षांनाही चुचकारण्याचे प्रयत्न भाजपनं सुरू केलेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा स्वतः मातोश्रीवर जाऊन राष्ट्रपतीपदाबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. राजू शेट्टींनाही त्यांनी भेटीसाठी यावं असा निरोप दिलाय.
भाजपनं अद्याप आपले पत्ते खुले न केल्यानं विरोधकांनीही आपला उमेदवार अजून जाहीर केलेला नाही. भाजप कुणाला उमेदवार देणार, हे ठरल्यानंतर विरोधक आपला उमेदवा घोषित करणार आहेत. देशातील सर्वोच्च पदावरून जोरदार राजकारण सुरू असतानाच, सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीभवनावर जाऊन भेट घेतली. उभयतांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. ही भेट नेमकी कशासाठी होती आणि भाजपच्या आग्रहानुसार राष्ट्रपदीपदाची निवडणूक खरंच बिनविरोध होईल का, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.