मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यामुळे कलाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. सुशांतने आत्महत्या का केली, याविषयी बऱ्याच उलटसुलट चर्चाही सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुशांतच्या मृत्यूपूर्वीचा एक विचित्र योगायोग सर्वांच्या लक्षात आणून दिला आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी सुशांत सिंह राजपूतच्या ट्विटर प्रोफाईलवर नजर टाकली. तेव्हा त्याने ट्विटरची कव्हर इमेज म्हणून एक पेटिंग ठेवले आहे. Starry Nights असे या पेटिंगचे नाव असून ते व्हिन्सेट व्हॅन गॉघ यांनी १८८९ मध्ये चितारले होते. त्यावेळी गॉघ हे नैराश्यामुळे मनोरुग्णालयात होते. यानंतर १८९० साली व्हिन्सेट गॉघ यांनी आत्महत्या केली.
...म्हणून सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली का? धक्कादायक खुलासा
व्हिन्सेट गॉघ यांचे Starry Nights हे पेटिंग त्यांच्या मृत्यूनंतर प्रचंड लोकप्रिय झाले. गॉघ यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या वर्षात त्यांच्यावर मानसिक उपचार सुरु होते. याच काळात त्यांनी Starry Nights हे पेटिंग काढले होते. २७ जुलै १८९० रोजी हे पेटिंग जवळपास पूर्ण होत आले असताना गॉघ यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यामुळे आता सुशांतने हेच पेटिंग ट्विटरच्या कव्हर पेजला ठेवल्याने चर्चा रंगली आहे. सुशांतही गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. त्याने हे पेटिंग ट्विटरच्या कव्हर पेजला ठेवून अगोदरच आत्महत्येचे संकेत दिले होते का, अशी चर्चा आता रंगली आहे.