मुंबई : अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुप्रिया सुळे भावूक झाल्या आहेत. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया व्हॉट्सऍप स्टेटवरून कळत आहे. अजित पवारांनी शरद पवारांसोबत केलेला अविश्वासघात हा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांबरोबरच सुप्रिया सुळेंच्या देखील जिव्हारी लागला आहे. सुप्रिया सुळेंनी पवार आणि उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाल्यावर आपली प्रतिक्रिया देण्याचं पत्रकारांना कबुल केलं आहे.
सुप्रिया सुळेंना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी भावूक होऊन योग्य वेळी ऑफिशिअल स्टेटमेंट देऊ असे म्हटलं. मात्र त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रू सर्व भावना व्यक्त करत होते. अजित पवारांच्या या निर्णयाने फक्त राष्ट्रवादी पक्षच नाही तर पवार कुटुंबात देखील फूट पडली आहे, असं सुप्रीया सुळेंनी आपल्या स्टेटसमधून व्यक्त केलं आहे.
तसेच सुप्रिया सुळेंनी दुसऱ्या स्टेटसमध्ये म्हटलंय की,'ज्या व्यक्तीवर इतका विश्वास ठेवला. ती व्यक्ती अशी फसवेल असं कधीच वाटलं नव्हतं. ज्या व्यक्तीला इतकं प्रेम दिलं त्यांनी त्याबद्दल बघा काय दिलं.' असं स्टेटस ठेवलं आहे. सुप्रिया सुळेंचं भावूक होणं आणि या स्टेटसवरून अजित पवारांचं हे वागणं जिव्हारी लागल्याचं स्पष्ट होत आहे.
अजित पवारांनी भारतीय जनता पार्टीसोबत येऊन सरकार स्थापन करण्यास तयारी दाखवली. सकाळी अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.ही घटना म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील राजकीय भूकंप आहे. याबाबत शरद पवारांनी ट्विट करून अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पक्षाचा निर्णय नाही. त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक असल्याचं समोर आलं. यानंतर अजित पवारांनी काका शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसलं असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. एवढंच नव्हे तर सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबात फूट पडल्याचं देखील म्हटलं.