मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविरोधात काहीतरी मोठं षडयंत्र सुरू असल्याचा खळबळजनक आरोप खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. शिंदेंना कमी दाखवण्यासाठीच त्यांना चिठ्ठी देणं, प्रॉम्टिंग करण्याची कामं सुरू आहेत. आणि यामागे काहीतरी मोठं षडयंत्र असून आपल्याला शिंदेंची काळजी वाटत असल्याचंही सुळेंनी नमूद केलंय.
आमच्या मुख्यमंत्र्यांच्या सारख्या चुका काढल्या जात आहेत, म्हणजे मुख्यमंत्र्यांना विषय माहित नाही की त्यांच्या पाठिमागे मोठं षडयंत्र रचलं जात आहे की जेणेकरुन मुख्यमंत्री हतबल दिसावेत आणि लोकांच्या डोळ्यातून उतरावेत असं मोठं षडयंत्र भाजप मुख्यमंत्र्यांविरोधात रचत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
तसंच सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवड केल्यास एकाच विचारसरणीची लोकं एकत्र येतील, त्यांच्यात कामापेक्षा वाद जास्त होतील, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला होता पण आताचं सरकार माजी मुख्यमंत्र्यांचे निर्णय बदलत चाललंय, यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे काही षडयंत्र रचलं जात आहे, मला त्यांची काळजी वाटते असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
याला आता भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही उत्तर दिलं आहे. कोणत्याही सरकारमध्ये सुपर सीएम नावाचा कोणी नसतो, एकच सीएम असतो, तोच नेता असतो आणि तोच प्रमुख असतो आमच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे एकच सीएम आहेत आणि आमच्या सर्वांचे ते नेते आहेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. काही लोकांना ते बघवत नाही असा टोलाही फडवणीस यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.