मुंबईत जोरदार वादळाचा एक बळी, पावसाची रिपरिप

जोरदार वादळामुळे मुंबईत एकाचा बळी गेला आहे. 

Updated: Jun 12, 2019, 06:06 PM IST
मुंबईत जोरदार वादळाचा एक बळी, पावसाची रिपरिप title=
मुंबई : आकाशात जमलेले ढग (छाया : सुरेंद्र गांगण)

मुंबई : जोरदार वादळामुळे मुंबईत एकाचा बळी गेला आहे. चर्चगेटजवळ डोक्यावर सिमेंटचे ब्लॉक पडून वृद्धाचा मृत्यू झाला. पुढील २४ तास समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे. दरम्यान, पुढच्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीजवळ चक्रीवादळाचा परिणाम जाणवेल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 

सोसाट्याचा वारा तसेच मोठा पाऊस होईल. त्यामुळे लोकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, तसेच झाडाजवळ, विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये, असे सांगण्यात आले आहे. वायू वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका किनारपट्टी भागास बसत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असून, समुद्र खवळला आहे. यामुळे किनार्‍यावर समुद्री लाटांचे रौद्ररूप दिसून येत आहे.

समुद्रातील वायू वादळाचा परिणाम किनारपट्टीवर जाणवत असून, वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. वायू चक्रीवादळामुळे रायगड किनारपट्टीवर देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. १२ आणि १३ जून हे दोन दिवस धोक्याचे असून उत्तर रायगडात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.