मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकाची अंतिम प्रभाग रचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता असून या निवडणुकीत चार प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पाच प्रमुख पक्षांमध्ये 236 जागांसाठी लढत होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या २३६ जागांपैकी जवळपास 120 जागांवर विजय मिळवण्याची खात्री भाजपला आहे. अर्थात सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. त्यामुळे सट्टा बाजारात भाजपची चलती आहे.
भाजपचा सध्याचा ट्रेंड पाहून हा आकडा 130 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जर भाजपने 120 जागा जिंकल्या तर बुकी प्रत्येक एक रुपयावर 1 रुपया द्यायला तयार आहे. 100 पेक्षा जास्त जागांवर भाजपच्या विजयावर सट्टा लावण्यासाठी, बुकींना प्रत्येक रुपयावर 0.25 पैसे द्यावे लागतील. 110 जागांसाठी एक रुपयावर 55 पैसे इतकी शक्यता आहे.