35 टक्के मिळाले म्हणून काय झालं, दहावी उत्तीर्ण झालेल्या विशालला व्हायचंय मॅकेनिकल इंजिनिअर

SSC Result : दहावीच्या परीक्षेवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता, तरी स्थिती आव्हानात्मक होती. विद्यार्थ्यांनी या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात परीक्षा दिली ही महत्त्वाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली होती. 

आकाश नेटके | Updated: Jun 3, 2023, 11:51 AM IST
35 टक्के मिळाले म्हणून काय झालं, दहावी उत्तीर्ण झालेल्या विशालला व्हायचंय मॅकेनिकल इंजिनिअर title=

SSC Result : शुक्रवारी राज्यातील दहावीच्या (10th Result) विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र हा निकाल गेल्या चार वर्षांपेक्षा सर्वात निचांकी असल्याचे समोर आले आहे. तसेच 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही घटली आहे. अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर काही जण केवळ उत्तीर्ण झाले आहेत. मात्र ठाण्यातील (Thane News) एक पठ्ठया सर्वच विषयात 35 गुण मिळवत काठावर पास झाला आहे.

ठाण्याच्या उथळसर भागात राहणाऱ्या विशाल अशोक कराड या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयांत 35 टक्के गुण मिळवले आहेत. विशालच्या या यशाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या विशालचे यश पाहून त्यांच्या आई वडिलांनीही त्याचे कौतुक केले आहे. विशालला सर्वच विषयात मिळालेले 35 गुण हे त्याचे यश इतर मुलांप्रमाणेच असून आम्ही आमच्या मुलाच्या यशात आनंदी आहोत, असे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

"मला 40 टक्क्यांची अपेक्षा होती, पण जे काही गुण मिळाले त्यात मी समाधानी आहे. निकाल हातात आल्यावर सर्वात आधी मी पास झालो आहे की नाही हे तपासले. त्यानंतर सगळ्या विषयांत मला 35 टक्के गुण मिळाल्याचे समोर आले. आम्ही सर्व या यशाने खूष आहोत," असं विशालने सांगितले. 

ठाण्याच्या शिवाईनगर येथील शिवाई विद्यालयात विशाल कराडने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने विशालने शिकून मॅकेनिकल इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलं आहे. विशालचे वडील हे रिक्षा चालवतात तर आई दिव्यांग असल्याने घरातच असते. दुसरीकडे विशालच्या पालकांना त्याच्या या यशाचे कौतुकच असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, यंदाच्या निकालातही कोकण विभागाने वर्चस्व कायम ठेवलं आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल लागला आहे. राज्यात 66 हजार विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर, 1 लाख 9,344 विद्यार्थ्यांना 85 ते 90 टक्के गुण मिळाले आहेत.

विभागनिहाय निकाल

98.11% कोकण विभाग
95.64% पुणे
92.05% नागपूर
93.23% औरंगाबाद
93.55% मुंबई
96.73% कोल्हापूर
93.22% अमरावती
92.22% नाशिक
92.76% लातूर