Solar Eclipse 2020 : कंकणाकृती सूर्यग्रहणाविषयी समज - गैरसमज

कोणत्या वेळेत कुठे दिसणार सूर्यग्रहण?  

Updated: Jun 21, 2020, 09:41 AM IST
Solar Eclipse 2020 : कंकणाकृती सूर्यग्रहणाविषयी समज - गैरसमज title=

मुंबई :  रविवारी २१ जून रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे.  हया सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था  राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही प्रदेशातून दिसणार असून उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसणार आहे. सध्या कोरोनाशी लढाई चालू असल्याने या सूर्यग्रहणाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. या सूर्यग्रहणामुळे असे घडेल, तसे घडेल असे  संदेश व्हायरल होत असल्याने जनसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खरं सांगायचे तर ग्रहणामुळे पृथ्वीवरचे वातावरण दूषित होत नसते. ग्रहणाचे वाईट परिणामही दिसून येत नाहीत. यावेळी ५ जून रोजी छायाकल्प चंद्रग्रहण झाले. २१ जूनला कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे आणि ५ जुलै रोजी पुन्हा छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे , परंतू ते भारतातून दिसणार नाही. लागोपाठ तीन ग्रहणे आल्यामुळे वाईट घडेल असे जे सांगितले जाते त्यात काहीही तथ्य नाही. सन २०१८ मध्येही १३ जुलै, २७ जुलै आणि ११ आॅगस्ट अशी लागोपाठ तीन ग्रहणे झाली होती त्यावेळी काहीही वाईट घडले नव्हते . यानंतर २०२९ मध्ये पुन्हा १२ जून, २६ जून आणि ११ जुलै अशी लागोपाठ तीन ग्रहणे होणार आहेत. अशी लागोपाठ तीन ग्रहणे अनेकवेळा आलेली आहेत. (Solar Eclipse 2020 : कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे निसर्गाचा अविष्कार) 

 

कोरोना आणि सूर्यग्रहण यांचाही संबंध सांगितला जातो. त्यात काहीही तथ्य नाही. कोरोना येणार असल्याचे भाकीत कोणी केले नव्हते. सूर्यग्रहणामुळे जर कोरोना जाणार असता तर २६ डिसेंबरच्या सूर्यग्रहणातच तो नष्ट झाला असता. त्यामुळे या सूर्यग्रहणामुळे कोरोना नष्ट होईल असे म्हणण्यात काहीही तथ्य नाही. (Solar Eclipse 2020 : जाणून घ्या सूर्यग्रहणाची योग्य वेळ) 

 

सूर्यग्रहणात काही धार्मिक नियम सांगितलेले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यामध्येही काही तथ्य नाही. अर्थात काही लोक ‘ श्रद्धा ‘ म्हणून नियम पाळीतअसतील तर मग बोलणेच खुंटले ! कारण श्रद्धा म्हटली की पुढे कार्यकारणभाव शोधणे येतच नाही. ग्रहणांचा घटनांवर किंवा मानवी जीवनावर परिणाम होत नाही असे विज्ञान सांगते. हे वैज्ञानिक युग आहे. पुढच्या पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून दिलेली उत्तरेच पटतात. आजचा भारत पुढची पिढी घडविणार आहे. त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे महत्त्वाचे आहे. पालक, शिक्षक यांनी ग्रहणासारख्या खगोलीय घटना व त्यामागचे विज्ञान नव्या पिढीला समजावून सांगितले पाहिजे. त्यासाठी पालक शिक्षकांनी स्वत: वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणे आवश्यक आहे. रविवारी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण ठरल्यावेळी सुटेल परंतु ग्रहणविषयक अंधश्रद्धांचे ग्रहण कधी सुटणार ?