मुंबई : रविवारी २१ जून रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. हया सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही प्रदेशातून दिसणार असून उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसणार आहे. सध्या कोरोनाशी लढाई चालू असल्याने या सूर्यग्रहणाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. या सूर्यग्रहणामुळे असे घडेल, तसे घडेल असे संदेश व्हायरल होत असल्याने जनसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना आणि वादळ यामुळे लोक आधीच ग्रासलेले असतांना अशी अवैज्ञानिक भाकीते चिंतेत भर टाकीत आहेत. त्यामुळे ग्रहणविषयक गैरसमजुतींचे ग्रहण सुटणे आवश्यक झाले आहे, असे खगोल अभ्यासक दा कृ सोमण यांनी सांगितले.
चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला झाकून टाकते त्यावेळी सूर्यग्रहण दिसते. ज्यावेळी चंद्रबिंबामुळे सूर्यबिंबाचा काही भाग झाकला जातो त्यावेळी ‘ खंडग्रास सूर्यग्रहण ‘ दिसते. ज्यावेळी संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते त्यावेळी ‘ खग्रास सूर्यग्रहण ‘ दिसते. खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब आकाराने लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. त्यावेळी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसते त्याला आपण ‘ कंकणाकृती सूर्यग्रहण ‘ असे म्हणतो. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे नैसर्गिक आविष्कार आहेत. प्राचीनकाळी ज्यावेळी विज्ञान प्रगत नव्हते त्यावेळी जनसामान्यांना ग्रहणांची भीती वाटणे साहजिकच होते. त्यामुळे काही प्राचीन ग्रंथांमध्ये ग्रहणकाळात पाळावयाचे नियम सांगितले गेले. परंतु विज्ञानात प्रगती झाल्यामुळे ग्रहण हा चमत्कार नसून तो एक नैसर्गिक खगोलीय आविष्कार आहे हे सर्वांना समजून आले आहे.
यापूर्वी २६ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातून दिसली होती. त्यावेळी उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते. यावेळी कंकणाकृती अवस्था पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड येथून सुमारे एक मिनिट दिसणार असून उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. विशेष म्हणजे जेथे भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली त्या कुरुक्षेत्रावरून दुपारी १२-०१ ते १२-०२ यावेळेत फक्त एक मिनिट कंकणाकृती अवस्था दिसणार आहे. कुरुक्षेत्रावर ब्रह्मा सरोवर आहे. काही भाविक ग्रहण सुटल्यावर ब्रह्मसरोवरावर तीर्थस्नानासाठी गर्दी करण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात हे सूर्यग्रहण होत असल्याने हरियाणा राज्यसरकारला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
कुरूक्षेत्र येथे १०-२१ ते १-४८ यावेळेत , जोशीमठ येथे १०-२८ ते १-५४, डेहराडून येथे १०-२४ ते १-५१ यावेळेत सूर्यग्रहण दिसणार आहे. या सर्व ठिकाणांहून सुमारे एक मिनिट कंकणाकृती अवस्था दिसणार आहे. मुंबई १०-०१ ते १-२८, पुणे १०-०३ ते १-३१, औरंगाबाद १०-०७ ते १-३७, नाशिक १०-१८ ते १-५१, नागपूर १०-१८ ते १-५१ आणि जळगांव येथे १०-०८ ते १-४० यावेळेत खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहण कधीही साध्या डोळ्यांनी पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण नेहमी ग्रहणचष्म्यातूनच पहावे. दुर्बिणीलाही योग्य फिल्टर लावूनच सूर्यग्रहण पहावे. यानंतर भारतातून दिसणारी कंकणाकृती सूर्यग्रहणे २१ मे २०३१, १७ फेब्रुवारी २०६४, ८ डिसेंबर २११३ रोजी होणार आहेत. महाराष्ट्रातून कंकणाकृती अवस्था दिसणारे सूर्यग्रहण खूप कालावधीनंतर ३ नोव्हेंबर २४०४ रोजी होणार आहे.