मुंबई : कोरोनाचे संकट आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना राज्य सरकारच्या नियमाना हरताळ फासण्यात येत आहे. कोरोनाचा धोका असताना लोक घराबाहेर पडताना दिसत आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत लॉकडाऊन आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ८३ हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच धक्कादायक बाब म्हणजे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर हल्ला होण्याचे प्रकार वाढत आहेत. आतापर्यंत पोलिसांवर हल्ला केल्याच्या १६५ घटनांची नोंद करण्यात आली आहे.
#Lockdown च्या काळात पोलिसांनी केलेली कारवाई
✅राज्यात कलम १८८ नुसार ८३ हजार १५६ गुन्हे दाखल
✅१६ हजार ८९७ व्यक्तींना अटक.
✅अवैध वाहतूक करणाऱ्या १११४ वाहनांवर गुन्हे
✅४९ हजार ८०२ वाहने जप्त
✅परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या १५ गुन्ह्यांची नोंद pic.twitter.com/ihJeQg4A5D— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 29, 2020
लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ८३,१५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १६,८९७ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ९४ लाख ६६ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
#coronavirus चा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस यांच्याकडून अहोरात्र मेहनत. परंतु, काही दुष्ट प्रवृत्तींकडून त्यांच्यावर हल्ला. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे पोलीस विभागाला आदेश- गृहमंत्री @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/wBJkJuWv1z
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 28, 2020
लॉकडाऊन कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबरवर ८०, ६१७ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन ( Quarantine) असा शिक्का आहे, अशा ६१८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १११४ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.व ४९,८०२ वाहने जप्त करण्यात आली. तर परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले गेले आहेत.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील कार्यरत आहेत. पोलिसांवर हल्ला प्रकरणे या कालावधीत वाढ झाली आहे. पोलिसांवर हल्ला होण्याच्या १६५ घटनांची नोंद झाली असून यात ६१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे
या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने २१ पोलीस अधिकारी व १३४ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ५ पोलीस अधिकारी व ६ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या १६ पोलीस अधिकारी व १२५ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.